जरसेश्वर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव

ऑफिस मध्ये काम नसताना मी भटकंती साठी नविन जागा शोधत असतो, आणि असच एक दिवस शोध घेत असताना जरसेश्वर या जागे बद्दल माहिती मिळाली. लगेच अक्षय आणि प्रसाद ला या नविन जागे बद्दल सांगितल. ते दोघही तयार झालेत आणि दुसऱ्या दिवशी असलेला शनिवार सत्कारणी लागला. 
जरसेश्वर हे एका टेकडीवर वसलेल एक छोटस गाव. इथे जायला पुर्वी कच्चा रस्ता होता पण आता चांगला पक्का रस्ता आहे. कोथरुड डेपो पासुन जरसेश्वर फक्त ३० किमी. असल्याने लवकर उठुन जायची घाई नव्हती. सकाळी आरामात उठुन नाश्ता करुन ११ वाजता आम्ही जरसेश्वर ला जायला निघालो. वारजे, शिवणे या रस्त्यानी NDA रोड ला लागलो. NDA रोड नी थोड अंतर पुढे गेल की एक रस्ता डाव्या हाताला खडकवासला धरणाकडे जातो आणि दुसरा रस्ता सरळ धरणाच्या बाजुनी कुडजे, मांडवी या गावांकडे जातो. ही गाव पार करुन पुढे गेल की एक वाट जरसेश्वर ला जाते. धरणाच्या बाजुनी जाणारा रस्ता खुपच सुंदर आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यानी जाताना सगळीकडे हिरवळ दिसते. मांडवी गावानंतर १-२ किमी वर स्प्लेंडर कन्ट्री (splendour country) क्लब आहे. या क्लब च्या १००-२०० मी. आधी उजव्या हाताला वर जाणारा रस्ता जरसेश्वर ला जातो. 
उजव्या हाताला वळल्याबरोबर १ सेक्युरीटी पोस्ट आहे. तिथल्या माणसानी आम्हाला हटकल आणि पुढे रस्ता नाही, दरड कोसळते अस सांगुन जाण्यास मनाई केली. पण आम्हीसुद्धा पुर्ण माहिती काढून आलो होतो आणि शेवटपर्यंत चांगला रस्ता आहे हे आम्हाला माहित होत. त्यामुळे आम्ही काळजी घेउ, रस्ता खराब असेल तर परत येउ अस त्याला सांगुन तिथे नोंदणी करुन पुढे निघालो.
आता इथुन पुढे ६-७ किमी घाट होता. पावसाळा असल्यामुळे वातावरण खुप मस्त होत. रस्त्यात काही ठिकाणी पहाडावरची माती पाण्यासोबत वाहत आली होती, तर काही ठिकाणी छोटे छोटे धबधबे होते. या रस्त्यानी जाताना डावी-उजवी कडे अनेक वाटा जातात. मुख्य रस्ता जरसेश्वर ला जातो. शेवटचे १००-२०० मी कच्चा रस्ता आहे पण गाडी जाते. घाटरस्ता, चढ-उतार आणि विलोभनीय दृश्य यामुळे जरसेश्वर सायकलिंग करता देखील मस्त ठिकाण आहे. 
वर गेल्यावर जरसेश्वराचे मोठे मंदिर आणि बाहेर १ मोठा नंदी दिसतो. मंदिराच्या जिर्णोध्धाराचे काम सुरु आहे. मंदिरा बाहेर अनेक दगडी मुर्ती आणि शंकराच्या पिंडी आहेत. गावातुन चालत पुढे गेल्यावर हेलिपॅड आणि १ तलाव आहे. उंचावरुन खडकवासला धरण आणि निसर्गाच विलोभनिय दृश्य 

पहायला मिळते. जरसेश्वर हे ठिकाण अजुन जास्त लोकांना माहित नसल्याने, इथे अजिबात गर्दी नसते. गावातल्या एका माणसानी दिलेल्या माहितीनुसार फक्त श्रावण सोमवार आणि माहाशिवरात्रीला लोक इथे दर्शनाला येतात.
पुर्ण परिसर फिरुन आम्ही परत यायला निघालो. रस्त्यानी वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत फोटो काढुन आम्ही दुपारी ३ वाजता घरी परत आलो.
- अभिराम 
१७ सप्टेंबर २०१७
जरसेश्वर

मंदिरा बाहेरील तलाव आणि दगडी मूर्ती

मंदिर आणि बाहेरील रेखीव कमान 


नंदी 

गावातून चालत गेल्यावर येणारा तलाव 

घाटरस्ता

जरसेश्वर चा घाटरस्ता आणि मागे असलेले खडकवासला धरण 


थोडी मस्ती 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजांचा राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी

दूधसागर