राजांचा राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी

पुण्यात आल्यावर ट्रेकिंग ला सुरवात झाली ती राजगडापासून. राजगड चढायला सोपा नाही असं अनेकवेळा ऐकलं होतं पण "अनुभव हीच परीक्षा" असा विचार करून राजगड ला जायचं नक्की केलं. मी लगेच प्रसाद ला फोन करून माझा प्लान सांगितला आणि शनिवार - ५ ऑक्टोबर घटस्थापनेला राजगडाच्या पद्मावती देवीच दर्शन घेण्याचं ठरलं.
शिवरायांचा बराचसा काळ हा राजगडावर गेलेला असल्यामुळे राजगडाला मराठ्यांच्या इतिहासात मोठे स्थान आहे. अफजलखान वधासाठी महाराज इथूनच बाहेर पडले, सुरतेच्या लुटीची आखणी ही राजगडावरच झाली, शाहिस्तेखानावर हल्ला करायला महाराज इथूनच निघाले, पन्हाळ्याचा वेढा फोडून महाराज विशाळगडावर गेलेत आणि तिथून परत आलेत ते राजगडाला, आग्र्याहून सुटून महाराज आलेत ते राजगडावरच, अनेक स्वाऱ्यांची खलबत ही राजगडावर झालीत आणि शहाजीराजे गेल्याची बातमी अली ती पण महाराज राजगडावर असतानाच. या सगळ्यांमुळे राजगडाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाणारा हा डोंगर महाराजांनी बांधून काढला आणि त्याच राजगड असं नामकरण केलं. 
ट्रेक ची सुरवात कुठून करायची वगैरे माहिती मी काढून ठेवली होती. "किल्ला चढायला साधारण दोन-अडीच तास लागतील त्यामुळे सकाळी ७ वाजता तरी किल्ला चढायला सुरवात करा" असं मला आधी अनेकदा जाऊन आलेल्या लोकांनी सांगितलं होत. त्यामुळे पहाटे ५ वाजता निघायचं असं ठरलं. पहाटे ४ ला  उठलो तेव्हा जोरदार पाऊस सुरु होता, पण आम्ही तरीही विचार बदलला नाही. एका बॅग मध्ये पिण्याचं पाणी आणि खाण्यासाठी काही पदार्थ घेऊन, रेनकोट घालून आम्ही ५.१५ ला निघालो. सतत सुरु असलेला पाऊस, पहाटेची वेळ आणि अनोळखी रस्ता यामुळे गुंजवणे या पायथ्याच्या गावात पोहोचायला आम्हाला ७ वाजले. तिथे गाडी लावली आणि चहा घेतला. चहा घेतानाच किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता विचारून घेतला आणि ७.३० ला किल्ला चढायला सुरवात केली. 
आता पाऊस पण थोडा थांबला होता पण सगळीकडे ढग होते त्यामुळे खूप दूरवरच दिसत नव्हतं. थोडी चढाई झाल्यावर ढग कमी झालेत आणि आमच्या डाव्या हाताला असलेली राजगडाची  सुवेळा माची दिसली. या माचीचे वैशिष्ट्य म्हणजे या माचीवर असलेल्या तटबंदी मध्ये असलेलं मोठं वर्तुळाकार छिद्र. या छिद्राला  "वाघाचा डोळा" म्हणतात. या छिद्रामुळे सुवेळा माची आणि राजगड दुरून ओळखू येतात. दरमजल करत दाट झाडीतून वाट काढत आम्ही राजगड जवळ करत होतो. मधातच पावसाचा शिरवा यायचा आणि मग पुन्हा सगळीकडे ढग दिसायचे.
सभोवतालचा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरत आम्ही ९-९.१५ ला पद्मावती माचीच्या चोर दरवाज्याशी पोहोचलो. दरवाजा पाहताच त्याला चोर दरवाजा का म्हणतात ते लक्षात आलं. साधारणपणे ३ फूट उंच आणि २ फूट रुंद अशा त्या दरवाजातून आत गेलो आणि पुढे असलेल्या काही पायऱ्या चढून वर आलो. समोरच पद्मावती तलाव होता आणि तलावाच्या बाजूनी १ रस्ता पद्मावती मंदिराकडे जात होता. मंदिराजवळ असलेल्या टाक्यातल्या पाण्यानी हातपाय धुवून मंदिरात गेलो आणि पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. मंदिराचा सभामंडप बराच मोठा आहे. १२-१५ लोक इथे सहज मुक्काम करू शकतात. 
मंदिरातून बाहेर आल्यावर थोडी पोटपूजा केली. टाक्यातील थंडगार पाणी भरून घेतलं आणि मग किल्ला बघायला सुरवात केली. पद्मावती माची ही बऱ्यापैकी सपाट असल्यामुळे सदर, राजवाडा इथेच होते. आता फक्त अवशेष बाकी आहेत. राजवाड्यापासून पुढे गेलं की अंबारखाना, घोड्यांची पागा यांचे अवशेष आहेत. समोर निशाणाची जागा आहे. इथून उजव्या हाताला पाली दरवाजा आणि संजीवनी माची कडे जाता येते आणि डाव्या हातानी पुढे गेलं की समोर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या डाव्या हातानी १ वाट सुवेळा माची कडे जाते.
राजगडाची रचना उंच आकाशात भरारी घेणाऱ्या गरुड पक्षाप्रमाणे आहे. पद्मावती माची म्हणजे चोच, बालेकिल्ला म्हणजे डोकं आणि सुवेळा, संजीवनी माच्या म्हणजे गरुडाचे पसरलेले पंख. एका सुवेळी ज्या माचीचे काम सुरु झाले ती सुवेळा माची, दुसऱ्या माचीचे काम सुरु असताना एक कामगार खाली पडला पण तो जिवंत राहिला म्हणून ती संजीवनी माची आणि जिथे पद्मावती देवी मंदिर आहे ती पद्मावती माची.
आम्ही पहिले बालेकिल्ला बघायचं ठरवलं आणि त्या मार्गानी पुढे निघालो. राजगडाचा बालेकिल्ला चढणे म्हणजे अत्यंत कठीण काम. आधीच अरुंद असलेल्या त्या पायऱ्या पावसामुळे खूप निसरड्या झाल्या होत्या त्यामुळे हळूहळू बालेकिल्ला चढायला सुरवात केली. बालेकिल्ला चढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. बालेकिल्ल्यावर मुख्य सदर, महाराजांचा तसेच जिजाबाईंचा वाडा, बाजारपेठ होती. आता फक्त अवशेष राहिले आहेत. बालेकिल्ल्यावर अनेक तलावही आहेत. राजगडाचा बालेकिल्ला म्हणजे सरळ सुळका आहे, त्यावर कुठूनही चढाई करणे अशक्य, पण तरीही बालेकिल्ल्याला तटबंदी घातली आहे. या शिवाय इथेही १ चोर दरवाजा आहे. राजगडाच्या बालेकिल्ल्या वरून तोरणा, सिंहगड, पुरंदर, रायगड, रायरेश्वर, पुणे असा सभोवतालचा भाग दृष्टीस पडतो त्यामुळे राजगडाचे भौगोलिक महत्व लक्षात येते आणि राजगडाला महाराजांनी पहिली राजधानी का केली असेल ते लक्षात येते.
बालेकिल्ला उतरून खाली आलो तेव्हा पोटात कावळे ओरडत होते. मग मस्त गरम गरम कांदा भज्यांवर ताव मारला. पुन्हा एकदा पोट भरून निघालो आणि आता मोर्चा वळवला सुवेळा माची कडे. सुवेळा माची कडे जाताना वाटेत १ उंचवटा लागतो याला डुबा म्हणतात. याच्या खालच्या अंगाला नरवीर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आदि मंडळींची घर आहेत (अर्थात आता फक्त अवशेष आहेत). पुढे सरळ सुवेळा माचीवर गेलो. वर चढून  वाघाच्या डोळ्यात जाऊन बसलो आणि सह्याद्री चा जोरदार वारा अनुभवला. काही वेळ तिथेच घालवून खाली उतरलो आणि परत पद्मावती माची कडे आलो. टाक्यातले थंड पाणी पिऊन थकवा गेला. एव्हाना ४.३० झाले होते आणि संजीवनी माची बघायची राहिली होती. पण वेळ नसल्यामुळे पुढच्या वेळेस संजीवनी माची पाहू असं ठरवून सभोवतालचा हिरवागार परिसर डोळ्यात भरून किल्ला उतरायला सुरवात केली.

        - अभिराम
१७ डिसेंबर २०१७

किल्ले राजगड 
पद्मावती माचीवर येणारी चोरवाट


चोर दरवाजा, पद्मावती माची 

पद्मतीर्थ तलाव, पद्मावती माची 

पद्मावती मंदिरासमोरून दिसणारा पद्मतीर्थ तलाव आणि सभोवतालचा परिसर 

राजगड बालेकिल्ला 

सदर, पद्मावती माची 

सुवेळा माची 

बालेकिल्ला - तलाव आणि वाड्याचे अवशेष 

बालेकिल्ला - महादरवाजा 

बुरुज - सुवेळा माची 

सुवेळा माची 

सुवेळा माचीवरून दिसणारा बालेकिल्ला 


सुवेळा माची - तटबंदी मध्ये असलेला वाघाचा डोळा 

Comments

Popular posts from this blog

जरसेश्वर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव

दूधसागर