दूधसागर

पुण्यात आल्यापासुन भरपूर भटकंती केली, अनेक ट्रेक केलेत, बरेच धबधबे पाहिलेत आणि मग ठरल की आता दूधसागर धबधबा बघायचा. मित्रमंडळी तर तयार होतीच.
लगेच कामाला लागलो आणि सगळी महिती जमवली. पावसाळ्यात केव्हा जाणं योग्य राहिलं ते ठरवल आणि मित्र-मैत्रिणींना कळवलं. तारिख नक्की झाली आणि १४ जणांचे ११ सप्टेंबर चे रेल्वे तिकिट्स बूक केलेत. सगळी तयारी झाली होती. सगळेच खुप उत्साहात होते (कारण चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात या धबधब्यासमोर रेल्वे थांबते हे सगळ्यांनीच पाहिलेल होतं.) भारतातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्यांपैकी एक असलेला दूधसागर (३१० मी) हा धबधबा गोआ आणि कर्नाटक राज्यांच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांडोवी नदीवर आहे.
प्रवासाला सुरवात झाली. गाडी मध्ये सगळ्यांनीच खुप धमाल केली. मी आमच्या स्वयंपाक वाल्या काकुंकडुन सगळ्यांना पुरतील इतके पराठे करुन घेतले होते. रात्री पराठ्यांवर सगळ्यांनी ताव मारला. सकाळी ४ वाजता उठायच आहे हे मी आधिच सांगून ठेवल होत त्यामुळे सगळे लवकर झोपले.
पहाटे बरोबर ३.४५ ला उठलो आणि बाकी मंडळींना उठवल. सगळे पटापट तयार झालेत. बरोबर ४.३० ला गाडी चा वेग कमी झाला आणि १५-२० सेकंद करता गाडी दूधसागर स्टेशन ला थांबली आणि इथुनच ॲड्व्हेन्चर्ला सुरवात झाली कारण त्या   १५-२० सेकंद मध्येच आम्हाला गाडीतून उड्या मारायच्या होत्या.
सगळे सुखरुप खाली उतरले आणि मग टोर्च च्या प्रकाशात पुढला प्रवास सुरु झाला. थोड्याच अंतरावर दूधसागर धबधबा होता. तिथे पोहोचलो तेव्हा अंधारच होता म्हणुन मग जवळच असलेल्या थोड्या मोकळ्या जागेत आरामात बसलो.
हळुहळू उजाडायला सुरुवात झाली आणि पहाटेच्या निळसर प्रकाशात दूधसागर धबधब्याच दर्शन झाल. ते पाहता क्षणीच या धबधब्याच दूधसागर हे नाव का पडल असाव ते लक्षात आल.
काहीवेळातच चांगल उजाडलेल होत आणि त्या प्रचंड मोठ्या धबधब्याच दर्शन झाल. सगळ्यांनी खूप फोटो काढून घेतले. पाण्याचा तो प्रचंड मोठा प्रपात सगळ्यांनी डोळे भरुन पाहिला आणि शेवटी सकाळी ७-७.३० च्या सुमारास आम्ही पुढे कुळेम स्टेशन ला जायला निघालो. दूधसागर ते कुळेम हे १४ किमी अंतर आता पायी जायच होत आणि तेही रेल्वे ट्रॅक च्या बाजु बाजुनी. दोन्ही बाजुने घनदाट जंगल, मध्ये रेल्वे ट्रॅक असा प्रवास सुरु झाला. या मार्गात अनेक बोगदे आहेत. बोगद्यातुन जाताना मजा यायची पण बोगद्यात गेल्यावर मालगाडी आली की छातीत धडधड व्हायची.
वाटेत अनेक ठिकाणी असलेल्या लहान लहान धबधब्यांमध्ये, बोगद्यावरुन पडणाऱ्या पाण्यामध्ये यथेच्च ओले होत होत ट्रेक सुरु होता. १०-११ च्या सुमाराला भूक लागल्यावर पुन्हा पराठ्यांवर ताव मारला. शिवाय प्रत्येकानी घरुन काहीना काही खायला आणलेले होतेच. काही जणांचा वन भोजनाचा हा पहिलाच अनुभव होता.
मजल दर मजल करत, सर्वत्र पसरलेली हिरवळ पाहत कुळेम स्टेशन ला आलो. सगळे प्रचंड थकलेले होते. स्टेशन वर सगळ्यांनी ओले कपडे बदलले आणि फ़्रेश झालेत. गाडी ची वाट पाहत असताना पुन्हा एकदा पेट पूजा झाली आणि गप्पांची रंगत वाढत गेली.
काही वेळातच ट्रेन आली. चालत आलो त्याच मार्गानी परत जायचे होते. जाताना परत एकदा दूधसागर चे दर्शन झाले. गाडीने थोडा वेग घेतला आणि आम्ही सर्वांनी आपापले बर्थ पकडले.
एक खुप सुंदर आठवण कायमची स्मरणात ठेवत सगळे जे गाढ झोपले ते दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे आल्यावरच उठले.                                                         

                                                                       


-- अभिराम

 ५ जून २०१७

Comments

Popular posts from this blog

जरसेश्वर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव

राजांचा राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी