२०० किमी बी.आर.एम. चा थरार
२०१५ साली कंपनीचा सायकलींग क्लब जॉइन केला आणि १२ वी नंतर बंद झालेल्या सायकलींग ला पुन्हा सुरुवात झाली. खुप विचारांती मी नविन सायकल घ्यायच ठरवल आणि सायकलींग क्लब च्या अनुभवी सदस्यांच्या सल्ल्याने एप्रिल २०१६ मधे सायकल घेतली. दर आठवड्याला १०० किमी तरी सायकल चालवायची अस ठरल आणि मग रोज सकाळी उठुन १५-२० किमी सायकलींग ला सुरवात झाली.
याच दरम्यान बी. आर. एम. (Brevet des Randonneurs
Mondiaux) या सायकलींग च्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली. बी. आर. एम. मधे १ विशिष्ठ अंतर दिलेल्या वेळेत पुर्ण करायचे असते. बी. आर. एम. २००, ३००, ४०० आणि ६०० किमी च्या असतात आणि हे अंतर अनुक्रमे १३.५, २०, २७ आणि ४० तासात पुर्ण करायचे असते. सर्वात मह्त्वाचे म्हणजे बी. आर. एम. करताना स्पर्धक हा सर्व बाबतित स्वयंपूर्ण असला पाहिजे. म्हणजे सायकल चालवताना येणारी सगळे आव्हाने त्यानी एकट्यानी पूर्ण करायची, अगदी सायकल चे पंचर जोडण्यापासुन तर खाण्याच्या सोयीपर्यंत.
इतक जास्त अंतर सायकल चालवायची सवय नसल्याने, खुप विचार करुन मी २०० किमी बी.आर.एम. मध्ये भाग घेण्याच नक्की केल. याआधी मी केलेली सगळ्यात मोठी राईड ही ५४ किमी ची होती, त्यामुळे आपण हे आव्हाहन पुर्ण करु शकतो की नाही ही भिती होतीच. शेवटी करुन तर पाहु अस म्हणून तयारी ला लागलो.
या बी.आर.एम. चा मार्ग पुणे-नागेवाडी-पुणे असा होता. नागेवाडी हे सातारा शहराच्या १०-१२ किमी आधी असलेल एक छोटस गाव. या गावापर्यंत जाउन परत पुण्याला यायच. पुर्ण अंतर हे महामार्गानी जायच असल्यामुळे रस्ता चांगला असणार ही खात्री होती.
आता मानसिक तयारी पुर्ण झाली होती आणि शारिरीक तयारी काही प्रमाणात होती. माझ्या सोबत कंपनीच्या सायकलींग क्लब चे आणखी ३ मेम्बर होते गणेश, मनिश आणि हरिश. या तिघांनीही या आधी बी.आर.एम. मधे भाग घेतलेला होता त्यामुळे मला मानसिक आधार होता, पण या तिघांचाही वेग माझ्यापेक्षा खुप जास्त होता त्यमुळे बी.आर.एम. च्या दर्म्यान आम्ही पुर्णवेळ सोबत राहणार नाही
हे मला महिती होत.
मी
पण मानसिक तयारी पुर्ण केलेली होती. शक्य होइल तितक अंतर पुर्ण करायच आणि खुप थकवा
आला तर परत यायच अस मी पक्क केलेल होत आणि घरी पण सगळ्यांना तस सांगितल.
पाहता
पाहता बी.आर.एम. चा दिवस जवळ आला. आदल्या दिवशी (१२ नोव्हेम्बर ला) एकदा सायकल आणि
बी.आर.एम. च्या दर्म्यान आवश्यक असलेल्या सगळ्या सामानाची तपासणी करुन मी या आव्हानासाठी
सज्ज असल्याची खात्री करुन घेतली.
१३
नोव्हेम्बर ला पहाटे ५ ला घरुन निघालो आणि बरोबर ५:३० ला पुणे विद्यापीठाच्या प्रवेश
द्वारावर पोचलो. बी.आर.एम. इथुनच सुरु होणार होती. तिथे बाकी बरेचसे स्पर्धक आधिच आले
होते. बी.आर.एम. च्या व्होलेंटिअर्स नी पुन्हा एकदा सायकल, लाईट, रिफ्लेक्टर्स, हेल्मेट
यांची तपासणी केली. बाकी औपचारिकता ही लगेच पुर्ण करुन मी, गणेश, मनिश आणि हरिश सोबत फ्लॅग ऑफ
ची वाट पाहायला लागलो. पाशाण रस्ता निसरडा झाला असल्यामुळे एसबी रोड - नल स्टॉप - पौड
रोड मार्गे चांदनी चौकात जायच अस आयोजकांनी घोशीत केल आणि बरोबर ६ वाजता बी.आर.एम.
ला सुरवात झाली.
सुरुवातीला
उत्साह खुप अस्ल्यामुळे मी पण बर्यापैकी वेग घेतला होता पण मग कात्रज बोगद्याच्या
आधी असलेल्या चढावानी माझा वेग कमी झाला. कात्रज बोगद्या आधी हरिश भेटला आणि मग आम्ही
दोघ सोबत पुढे निघालो. बोगदा पुर्ण झाल्यावर असलेल्या उताराचा फायदा घेत आम्ही दोघांनीही
वेग वाढवला आणि एकदम कापुरहोळ गावानंतर एका हॉटेल वर थांबलो त्यावेळेस ८ वाजले होते.
तिथे मोसंबी ज्युस घेवुन पुढे निघालो.
थोडावेळ
हरिश सोबत होता पण काहीवेळातच तो समोर निघुन गेला. मनिश आणि गणेश तर बी.आर.एम. सुरु
झाल्यापासुन दिसलेच नव्हते. मी आपला आरामात पायडल मारत पुढे पुढे जात होतो. रस्त्यात
अनेक लोक प्रश्न विचारत होते. "कुठुन आले? कुठे जाणार आहात? रेस आहे का?"
मी त्यांना १-२ शब्दात उत्तर देत होतो. जमेल तसा वेग घेत, रस्त्यात लागणारी गाव पार
करत करत मी पुढे जात होतो. वाटेत मी काही स्पर्धकांना मागे टाकल होत त्यामुळे कोणीतरी
आपल्या मागे आहे या विचारानी मी खुश होतो. या विचारातच मी सायकल चालवत होतो आणि अचानक
हरिश चा आवाज आला. रस्त्या लगतच्या एका छोट्या हॉटेल मधे तो थांबला होता. मी पण त्या
हॉटेल मधे गेलो. तो नुकताच तिथे पोचला होत. ईथुन पुढे खंबाटकी घाट सुरु होणार होता,
त्या आधी काहीतरी खावुन घ्याव म्हणुन तो थांबला होता. थोडा आराम होइल म्हणुन मी पण
थांबलो. तिथे १ वडा पाव आणि सोबत आणलेली चिक्की खावुन पुढची स्वारी सुरु केली.
खंबाटकी
घाट हा या बी.आर.एम. चा सगळ्यात कठीण टप्पा होता. आता सलग ७ किमी. ची चढण होती. हळुहळु
चढायला सुरवात केली. बाजुनी जाणार्या गाड्यांमधले लोक आच्छर्यानी पाहत होते आणि टाळ्या
वाजवुन, हात दाखवुन मला प्रोत्साहन देत होते. पाण्याचे घोट घेत घेत, २-१ अशा गिअर वर
हळुहळु पायडल मारत मी पुढे सरकत होतो. घाटाचा चढ खुप जास्त असल्यामुळे मोठे ट्रक फारच
सावकाश जात होते आणि त्यामुळे मला त्यांच्या मागुन जाताना खुप सांभाळुन रहाव लागत होत.
थोड थोड करत मी घाटाच्या खिंडीत पोचलो आणि मग इतक्या वेळ घेतलेल्या मेहनतीच फळ मिळाल.
उतार सुरु झाला. दोन्ही ब्रेक्स वर हात ठेवुन मी त्या उतारावर सायकल सोडली. उतार मोठा
असल्याने ३-४ किमी तरी पायडल मारायची गरज नव्हती, त्यामुळे घाटात सायकल चढवताना प्रचंड
मेहनत घेतलेल्या पायांना चांगली विश्रांती मिळाली.
घाट
उतरुन सातार्याकडे जाताना विरुध्ध दिशेनी काही स्पर्धक परत जाताना दिसले. त्यांनी
हात उंचावून ३ बोट दाखवले. त्यावरुन चेक पोइंट आता फक्त ३ किमी वर आहे हे मी ओळखल आणि
पायडल मारायला लागलो. एव्हाना सूर्यदेव डोक्यावर आले होते. आणि मला थकवा पण खुप आला
होता. जवळच पाणी पण संपल होत. त्यामुळे ते ३ किमी पण मला खुप वाटत होते. ते ३ किमी
पुर्ण करायला मला जवळपास २०-२५ मि. लागले. आणि शेवटी तो नागेवाडी चा चेक पॉइंट आला.
तिथे पोचल्यावर लगेच ब्रेव्हे कार्ड वर सही आणि वेळेचा शिक्का घेतला तेव्हा १२:३० वाजले
होते. १:१५ वाजण्याआधी या चेक पॉइंट ला पोचायच होत आणि मी चक्क ४५ मि. आधी आलो होतो.
अर्धा टप्पा पुर्ण झाल्याच समाधान मिळाल होत.
तिथे
थोडावेळ आराम केला. केळ, बिस्कीट आणि चिक्की खाउन पोटभर पाणी पिलो. चेहर्यावर पाणी
मारुन फ्रेश झालो. जवळच्या दोन्ही बाटल्या पाण्यानी भरुन घेतल्या आणि परतीच्या प्रवासासाठी
सज्ज झालो. अर्धा तास विश्रांती घेउन १ वाजता मी परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
आता
ऊन खुप वाढल होत त्यामुळे सायकल चालवताना खुप थकवा येत होता. आणि इतक अंतर सायकल चालवायची
सवय नसल्याने पाय खुप दुखत होते. या सगळ्यांमुळे माझा वेग फारच कमी झाला होता. तरी
मी पुर्ण ताकद लावुन पायडल मारत राहिलो. १५-२० किमी नंतर मात्र मी रस्त्यालगतच्या एका
हॉटेल मधे थांबलो. तिथुन १ कोल्डड्रिंक घेतल आणि लगेच बाटली तोंडाला लावुन रिकामी केली.
उन्हामुळे आणि खुप जास्त मेहनती मुळे गरम झालेल्या शरिराला त्या कोल्डड्रिंक मुळे थोडा
गारवा मिळाला. पण पायांच काय? ते तर अजुनही भयंकर दुखत होते. तरी सायकल काढली आणि काही
अंतर समोर आलो. तितक्यात माझ लक्ष सर्विस लेन कडे गेल. एका मोठ्या कडुनिंबाची मस्त
सावली पडली होती तिथे. लगेच सायकल त्या झाडाखाली घेतली. हेलमेट काढुन सायकल वर टांगल,
पायातले बूट मोजे काढले आणि त्या कडुनिंबाच्या थंडगार सावलीत रस्त्यावरच झोपलो. १५-२०
मि. मस्त झोप काढली. उठल्यावर पाणी पिलो आणि सगळा थकवा दूर गेला. पुन्हा तयार होवुन
सायकल वर टांग मारली. आता दिसेल त्या हॉटेल ला थांबुन पाणी भरुन घ्यायच अस ठरवुन सायकल
पळवायला सुरवात केली.
त्या
१५-२० मि. च्या झोपेनी खुप फायदा झाला होता, त्यामुळे मिळालेल्या वेगाचा फायदा घेत
मी पुढचे ४० किमी पार करुन एकदम शिरवळ ला थांबलो. मी झोपलो असताना माझ्यापुढे गेलेल्या
३-४ स्पर्धकांना मी या दरम्यान मागे टाकल होत. शिरवळ गावा बाहेर एका चहाच्या टपरी वर
थांबून मस्त गरम चहा घेतला आणि बिस्किट खाल्ले. आणि पाणी भरून पुन्हा पुढे निघालो.
१-१
किमी अंतर कापत मी खेड-शिवपुर चा टोल नाका गाठला तेव्हा संध्याकाळचे ५:३० वाजले होते.
आता फक्त २५ किमी अंतर बाकी होत आणि त्यासाठी माझ्याकडे २ तास होते. म्हणजे हत्ती गेला
आणि शेपुट बाकी होत. पण "पुणे तिथे काय उणे" अस म्हणणार्या पुण्याचा ट्रॅफिक
शेवटची कसोटी बघायला तयार होताच. गर्दितून वाट काढत मी कात्रज चा बोगदा गाठला. आणि
पुन्हा एकदा मस्त उतार सुरू झाला. आता उतार असुन सुद्धा मी वेगात पायडल मारत होतो.
कात्रज बोगदा पार केल्यावर माझा वेग इतका वाढला होता की रस्त्यातल्या काही कार्स ला
पण मी मागे टाकल होत. त्या वेगातच सिंहगड रोड वरचा पूल चढलो आणि पुन्हा एकदा ट्रफिक
मधे अडकलो. वारजे ला पोचलो तेव्हा ६:४५ झाले होते. शेवटचे फक्त ५ किमी बाकी होते, पण
थकवा आणि भूक यामुळे वेग खुप कमी झाला होता. एक एक पायडल मारत मी चांदणी चौकात आलो.
चांदणी चौकाचा शेवटचा चढाव चढून वर सी.सी.डी. ला आलो तेव्हा ७:१५ झाले होते. लगेच ब्रॅव्हे
कार्ड वर सही शिक्का घेतला, आणि माझी पहिलीच बी.आर.एम. मी पहिल्याच प्रयत्नात १३ तास
१५ मि. इतका वेळ घेउन यशस्वीपणे पुर्ण केली होती.
आता
शेवटचा टप्पा होता तो म्हणजे अजुन ३ किमी सायकल चालवून घरी जाण्याचा. पण इतकी मोठी
राईड पहिल्याच प्रयत्नात पुर्ण केल्याचा आनंद हा त्या ३ किमी पेक्षा खुप मोठा होता.



Bohot Sahi..keep going man..👍
ReplyDeletethanks bhau
Deleteएक नंबर👌👌👌👌
ReplyDeleteबारीक बारीक गोष्टी मस्त उतरवल्यात
Dhanyawad
Delete